पोवळा साप देशातील सर्वात लहान आकाराचा विषारी साप
सिल्लोड, (प्रतिनिधी) : पहिल्यांदाच दुर्मिळ सिलेंडर कोरल स्नेक म्हणजेच पोवळा सापाची अधिकृत नोंद झाली. तालुक्यातील वांजोळा येथे गणेश राजपूत या शेतकऱ्याने शेतातून घरी आणलेल्या भुईमुगामध्ये शेंगा निवडताना हा दुर्मिळ व जैवविविधतेमध्ये महत्त्वाचा मानला जाणारा साप आढळला.
राजपूत यांच्या पत्नी भुईमुगातून शेंगा निवडत असताना त्यामध्ये हा साप शेतातून आला. ही माहिती राजपूत यांनी भवन येथील सर्पमित्र प्रदीप जयस्वाल यांना दिली. जैस्वाल यांनी हा साप अधिक माहितीसाठी सिल्लोड येथील डॉक्टर संतोष पाटील त्यांच्याकडे घेऊन आले.
अत्यंत दुर्मिळ व विषारी प्रजातीचा पोवळा म्हणजेच रात सर्प सिल्लोड येथील वन्यजीव अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी वनविभागाचे कर्मचारी विलास नरवाडे, जैस्वाल यांना सोबत घेऊन या सापास त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त केले. या सापाची वनविभागाकडे अधिकृत नोंद करण्यात येऊन शासनाने दिलेल्या पी.बी. आर
मध्येही नोंद घेण्यात आली.
या साप मन्यार यांच्या ईलापिडी शास्त्रीय गटातील असून या सापाचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करते. जे न्यूरो टॉक्सिक प्रकारचे आहे. सदर पोवळा साप चावण्याच्या घटना नगण्य घडतात कारण या सापाचे तोंड एकदम छोटे म्हणजे गव्हाच्या दाण्याच्या आकाराचे अंदाजे एक सेमी व्यासाचे असते व दात आत वळलेले असतात.
शरीरामध्ये फार तर एक दोन थेंब इतकेच विष असते, त्यामुळे हा साप चावून मानवी अथवा इतर जीवांना विषबाधा होऊन मृत्यू येणे अथवा आपत्कालीन गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. भारतात विषारी सापांच्या साठ जाती आढळतात.
त्यापैकी आकार व लांबीने सर्वात छोटा व विषारी साप म्हणजे पोवळा समजला जातो. या पूर्ण वाढ झालेल्या सापाची लांबी १३ ते १५ इंच इतकीच होते व पेनाच्या जाडी इतके त्याचे शरीर जाडसर असते. आज आढळलेला साप ही १३ इंच लांब व पूर्ण वाढ झालेला साप आहे.
हा साप लहान पाली सरड्यांचे पिलं, कीटक आधी खाऊन निसर्गामध्ये व अन्नसाखळीमध्ये आपली भूमिका बजावत असतो. हा साप चिडला असता आपली शेपटी उगारतो. आपल्या पोटाकडची त्वचा स्वतःहून लालसर बनवतो ज्यामुळे त्याच्या शत्रूला अथवा उपस्थित घटकाला तो चेतावणी देतो. त्याच्या शेपटी वर दोन काळे ठिपके असतात. चेहऱ्याचा पूर्ण काळा भाग असतो. हा साप चिडला असता वा संकटामध्ये स्वतःचे तोंड व शेपटी उगारून त्यास दोन तोंड आहेत असा भास निर्माण करतो.
- डॉ. संतोष पाटील, वन्यजीव संवर्धक, सिल्लोड














